नवरात्राचे विधिविधान –
नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवघर व देव्हाऱ्याची साफसफाई करून देवमुर्तींचे उद्वार्जन (स्वच्छता) करून घ्यावे. ह्यानंतर संकल्प करून घटस्थापन (वरुणस्थापन), वेदिकास्थापन व त्यानंतर दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे अभिषेकासहित षोडशोपचारपूजन करावे. ताम्हणात तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पीठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करुन नंतर मालाबंधन करावे. मध्याह्नी महानैवेद्य दाखवून आरती करावी व प्रथेनुसार दांपत्य, कुमारी इत्यादिकांना अन्नसंतर्पण करावे. महोत्सव कालामध्ये दरदोज जलप्रोक्षण करुन (फुलाने पाणी शिंपडून ) पूजा व मालाबंधन करुन यशाशक्ति देवीआराधना करावी.
नवरात्रोत्थापनाच्या दिवशी (म्हणजेच दहाव्या दिवशी – दशमीला) जलप्रोक्षणाने पूजा, मालाबंधन व नेहमीची देवीउपसना झाल्यावर ’मात: क्षमस्व’ किंवा ’देव क्षमस्व’ अशी प्रार्थना करावी. नंतर त्या देवतेचा घोष करुन (उदाहरणार्थ; ’दुर्गायै नम:, व्यंकटेशाय नम:, मल्लारिमार्तंडाय नम:) देवतेच्या ईशान्य दिशेस एक फूल वाहून देवप्रतिमा त्या दिशेकडे किंचित हालवावी व्यंकटेशाचे व जोतिबावे देवीच्या शारदीय नवरात्रकाळातच येत असल्यामुळे दोन्ही नवरात्रे दशमीस उठवण्याची प्रथा आहे. नवरात्र उठवाल्यानंतर घट, शेतातील अंकुर, माळा ह्यांच्यावर अक्षता वाहून त्याचें विसर्जन झाल्यावर घटातील जलाने घरातील सर्वांवर सिंचन करावे. ह्यानंतर दांपत्य-कुमारी भोजन घालून वेळेच्या उपलब्धीनुसार त्याच दिवशी अन्यथा दुसऱ्या दिवशी देवतांचे उद्वार्जनपूर्वक षोडशोपचारपूजन करावे.
नवरात्रकाळातील अशौचप्राप्ती –
नवरात्र व अशौच (सोहेर व सूतक) ह्यांच्या संदर्भात तीन पर्यात संभवतात.
१) अशौच चालू असताना नवरात्र आले असता उपवासादी व्रताचार सुरु करुन अशौचसमाप्ती होताच घटस्थापना करुन नवरात्रप्रारंभ करावा, अशा वेळी नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी घटत असला, तरी नवरात्राचे पालन होणे क्रमप्राप्त ठरते.
२) नवरात्र चालू असताना अशौच आले असरा घरातील ब्रह्मचारी मुलगा, कुलोपाध्याय किंवा आप्त (स्नेही) ह्यांचेकडून नवरात्रातील पूजा, मालाबंधन इत्यादी नित्यविधी तसेच नवरात्रोत्थापन करवून घ्यावे, अशा वेळी आपल्या घरातील वा दुसऱ्याच्या घरातील (परान्न) शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे दुधसाखरेचा नैवेद्य दाखवाव. स्वत:च्या उपवासादी व्रताचारामध्ये खंड पडू देऊ नये. नवरात्रापूर्वी अशौचसमाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे स्वत: उपरोक्त विधी करावेत.
३) नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्यापुर्वी घरामध्ये निधनघटना घडून अशौच आले व ते नवरात्र समाप्ती पर्यंत रहात असेल तर सपंडीकरण होईपर्यंत कोणतेही देवकार्य करण्यास शास्त्रसंमती नसल्याकारणाने नवरात्रमहोत्सव करता येत नाही. तथापि उपवासात्मक व्रताचाराचे पालन करावे. अशौचसमाप्तीनंतर नवरात्र खंडित झाल्याबद्दल महाभिषेकपूर्वक पूजा व समाराधन करावी.
नवरात्रकाळातील श्राद्ध – शार्दीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामहश्राद्ध असते. सुवासिनी स्त्रीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ह्या दिवशी दौहित्रश्राद्धरुपाने मिळत असते. नवरात्रकाळात प्रथम वर्षश्राद्ध अथवा प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आल्यास ते नवरात्राकाळातच करावे, पुढे ढकलू नये.
साभार – शास्त्र असे सांगते !
पुढील भागात पाहू नवरात्र काळातील आचार पालन…..
इथे वाचा …..
(मागील) भाग -१ – नवरात्र – शास्त्रीय मीमांसा
4 Comments