ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्र – भाग १ – आयुर्दाय

               सर्व प्रथम पत्रिका हातात आल्यावर ज्योतिषांनी काय पाहावे ? (सांगावे नव्हे). फलदीपिकेत मंत्रेश्वरानी म्हटले आहे कि, “सर्वप्रथम जातकाच्या आयुष्याचा विचार करावा, त्यानंतर पत्रिकेतील इतर योगांच्या फळांचा विचार करावा.” बऱ्याच जुन्या  ज्योतिषांचेही  हेच मत आहे कि सर्वप्रथम पत्रिका हातात आल्यावर जातकाचे आयुष्यमान पाहावे आणि त्यानंतरच इतर भविष्य  कथानकडे वळावे. बरेच ज्योतिषी जातकाच्या पत्रिकेतील मोठ- मोठे राजयोग पाहून बऱ्याच लांब पल्ल्याची भविष्यवाणी करतात पण तो जातक खरच त्या दशेपर्यंत हयात राहील का ? हे पाहताच नाहीत.  ज्योतिष शास्त्रात सुद्धा जातकाच्या आयुर्दायासंबंधात विशेष किचकट गणित न करता जातकाच्या आयुर्दायाविषयी एक अंदाज बांधता येतो अशी काही सूत्रे आहे. यासाठी लग्न व नवमांश कुंडलीची गरज असते, काही ठिकाणी द्रेष्काण कुंडलीचा विचार केला जातो. बऱ्याच वेळी केवळ लग्न कुंडलीवरूनच चांगला अंदाज बांधता येतो.

           तसे पाहता जातकाचे आयुष्य किती आहे हे पाहण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, जसे पिंडायू , अंशायु , अष्टकवर्ग इ. पण या सर्व पद्धती अतिशय किचकट गणित करून पाहाव्या लागतात, असेच वेळखाऊ हि आहेत. एक अभ्यास म्हणून या विद्यार्थ्यांनी जरूर आत्मसात कराव्यात, पण जातक समोर असताताना सहज व झटपट काही सूत्रे माहित असतील तर त्याचा ज्योतिषांना नक्कीच फायदा होऊ शकतो. खालील पैकी कोणतेही एक सूत्र वापरून आपण विशेष गणित न करता जातकाच्या आयुर्दायासंबंधात एक निश्चित अंदाज बांधू  शकतो.

मनुष्याच्या आयुर्दायासंबंधात आपल्या ज्योतिष शास्त्रात ४ प्रकारात वर्गवारी केली आहे.

पहिली ८ वर्षे बलारिष्ट .

८-३२ वर्षापर्यंत अल्पायु.

३३-६५ वर्षापर्यंत मध्यायु .

६५ वर्षापेक्षा अधिक दीर्घायु .

इथे आपण बलारिष्टचा विचार करणार नाही आहोत, इथे केवळ अल्पायु, मध्यायु व दीर्घायु या बद्दलच विचार केला आहे.

Belgaum Maratha Matrimony

Belgaum Maratha Matrimony

सूत्र – १   –

 फलदीपिका  या ग्रंथात फारसे गणित न करता जातकाचा आयुर्दाय ठरविण्यासाठी काही सूत्रे  दिलेली आहेत.

 हा नियम पाहताना, लग्न व नवमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. खालील  पैकी कोण आपल्या अष्टमेशापेक्षा बलवान आहे ते पाहावे, व निर्णय करावा

१) लग्नाचा स्वामी २) लग्न नवमांशाचा स्वामी ३) चंद्र राशीचा स्वामी ४) चंद्र नवमांशाचा स्वामी – जर हे चारही आपापल्या अष्टमेश पेक्षा बलवान असतील तर दीर्घायु व बलहीन असतील तर अल्पायु समाजावे.

लग्नाचा स्वामी अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

नवमांश लग्नस्वामी नवमांश अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

जन्म राशी स्वामी जन्मराशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

चंद्र नवमांश राशी स्वामी चंद्र नवमांश राशीच्या अष्टमेशापेक्षा बलवान असेल,

तर व्यक्ती दीर्घायु असेल आणि उलट असेल तर अल्पायु.  इतर वेळी म्हणजे काही मध्ये लग्न स्वामी बलवान व काही मध्ये अष्टमेश बलवान तर तारतम्याने विचार करावा.

  • फलदीपिका – अ.- १३ श्लो. १६

 

सूत्र – २   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी लग्न कुंडली, नवमांश कुंडली व द्वादशांश कुंडलीची गरज लागते. या तीनही कुंडलींचा साकल्याने विचार करून आयुर्दाय ठरवता येतो.

  • लग्न द्रेष्काण राशी आणि चंद्र द्रेष्काण राशी पहा,

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

 

  • लग्नेशाची नवमांश राशी आणि चंद्रशाची नवमांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* (चंद्रशाची नवमांश राशी म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी ज्या नवमांशात आहे ती राशी.)

 

  • लग्नेशाची द्वादशांश राशी आणि अष्टमेशाची द्वादशांश राशी पहा.

जर दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

जर दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

जर दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

* वरील तीनही मतांचा विचार करून बहुमतांनी जो निर्णय येईल त्याप्रमाणे आयुर्दाय ठरवावा.

– फलदीपिका अ. १३ श्लो. १४

सूत्र – ३   –

या सूत्रांनी आयुर्दाय ठरविण्यासाठी केवळ लग्न कुंडली विचारात घेतली जाते.

जर लग्नाचा स्वामी आणि सर्व शुभ ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर दीर्घायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर अल्पायु असेल. 

जर अष्टमेश आणि सर्व क्रूर ग्रह पहा.

१) वरील ग्रह केंद्र स्थानात असतील तर  अल्पायु असेल.

२) वरील ग्रह पणफर स्थानात असतील तर मध्यायु  असेल.

३) वरील ग्रह अपोक्लीम  स्थानात असतील तर दीर्घायु असेल. 

 

सूत्र – ४   –

 कुंडलीत खालील ग्रह परस्पर मित्र आहेत कि शत्रू ते पहा.

१) चंद्र राशीचा स्वामी व चंद्र राशीच्या अष्टमाचा स्वामी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

२) लग्नेश आणि अष्टमेश एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

३) लग्नेश आणि रवी एकमेकांचे मित्र आहेत कि शत्रू.

जर वरील ग्रह परस्परांचे मित्र असतील तर दीर्घायु , सॅम असतील तर मध्यायु आणि शत्रू असतील तर अल्पायु असेल.

  • फलदीपिका अ. १३ श्लो. १५

 

सूत्र – ५  –

       जैमिनी पद्धतीमध्येही असेच एक सूत्र सांगितले आहे आणि ते जास्त प्रचलितही आहे. यासाठी लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेशचा विचार केला जातो. लग्न कुंडलीत लग्नेश व अष्टमेश पहा.

१) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही चर राशीत असतील किंवा  एक स्थिर व एक व्दिस्वभाव  राशीत असेल तर दीर्घायु असेल.

२) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही व्दिस्वभाव राशीत असतील किंवा एक चर व एक स्थिर राशीत असेल तर मध्यायु असेल. 

३) जर लग्नेश व अष्टमेश दोन्ही स्थिर राशीत असतील  किंवा एक चर व एक व्दिस्वभाव राशीत असेल तर अल्पायु असेल.

Belgaum Maratha Matrimony Ad2

Belgaum Maratha Matrimony Ad2

सूत्र – ६ –

       कृष्णमूर्ती पद्धतीतही असेच एक सूत्र सांगितले आहे कि, ज्यावरून जातक अल्पायु आहे, मध्यायु आहे कि दीर्घायु आहे हे फारसे गणित न करता सांगता येते.

* पण कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम जन्म कुंडलीला लागू करावे का ? खास करून अशा महत्वाच्या बाबतीत हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. जेथे दिड – दोन मिनिटाच्या फरकाने उपनक्षत्र स्वामी बदलतात अशा ठिकाणी असे नियम वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते. (रुलिंग प्लॅनेटच्या साहाय्याने केलेले बर्थ टाइम रेक्टिफिक्शन हे मला तरी पटत नाही.) असो, इथे सूत्र काय आहे ते पाहू.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार १, ५, ९, १० व ११ हि आयुष्यवर्धक स्थाने आहेत.  (*९ स्थान हे स्थिर लग्नाला व ११ स्थान हे चर लग्नाला बाधक असल्याने स्थिर लग्नाच्या बाबतीत ९ व चर लग्नाच्या बाबतीत ११ हे स्थान वगळावे.)

६, ८ व १२ व मारक (२, ७), बाधक (चर लग्न – ११, स्थिर लग्न – ९, द्विस्वभाव लग्न – ७) हि स्थाने आयुष्य विघातक मनाली जातात.

कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्दाय ठरविताना नियम असा आहे कि,

१) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्यवर्धक स्थानाचाच कारक असेल व आयुष्याविघातक स्थानाचा कारक नसेल तर जातक दीर्घायु असेल. 

२) जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा केवळ आयुष्याविघातक  स्थानाचाच कारक असेल व आयुष्यवर्धक स्थानाचा कारक नसेल तर जातक अल्पायु असेल.

३)  जर लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा आयुष्यवर्धक व  आयुष्याविघातक  अशा दोनही स्थानाचा कारक असेल  तर जातक मध्यायु  असेल.

हा नियम पाहताना बरेच ज्योतिषी वरील प्रमाणेच ३ व ८ स्थानाचा उपनक्षत्र स्वामीही तपासून  पाहतात. तसेच कारक म्हणून शनी ग्रहही वरील पैकी कोणत्या स्थानाचा कारक आहे तेही पाहतात. सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची अवस्था हि “कृष्णमूर्ती आपली आपली” अशीच झाली आहे. असो.  

पुढच्या लेखात दुसऱ्या एखाद्या विषयावर अशीच काही ज्योतिष शास्त्रातील महत्वपूर्ण सूत्रे पाहू.

 सूचना – प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

 धन्यवाद !

 


 

हे हि लेख वाचा

ज्योतिष शास्त्रातील महत्वाची सूत्रे – भाग २- पिता-पुत्र संबंध

संतान दीपिका अर्थानं संतती योग

सहदेव भाडळी

क्रकच योग

 


BACK TO HOME

BACK TO JYOTISH

DOWNLOAD OUR E-MAGAZINE (FREE)


Uttam Gawade

 

श्री उत्तम गावडे
ज्योतिष विशारद, वास्तु विशारद
9901287974

 

कृष्णमुर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च-नीचत्व –

कृष्णमुर्ती पद्धती ही पारंपारीक पद्धती पेक्षा थोडी वेगळी असली तरी अगदिच विरोधी नाही आहे. पारंपारीक पद्धतीमधील बहुतेक सर्वच मूलभूत नियम कायम ठेऊन श्री कृष्णमुर्तीनी आपली ही पद्धती विकसित केली आहे ज्यात आवश्यक तेथे पाश्चात पद्धतीचाही वापर केला गेला आहे. पण बऱ्याच ठिकाणी कॄष्णमुर्ती पद्धतीच्या नांवाने बरेच लोक आपले नविन नियम किंवा आपली मते या पद्धतीवर थोपण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. असाच एक विषय म्हणजे कॄष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही आहे. मूळात ज्योतिष शास्त्रात माझ्या माहीतीप्रमाणे अशी एकही पद्धती नाही आहे जिथे ग्रहांचे उच्चत्व -नीच्चत्व मान्य नाही, ग्रहांच्या स्वराशी, उच्च राशी, नीच राशी, मुलत्रिकोण राशी, निर्बल राशी इ. गोष्टिंना फलज्योतिषात अनन्यसाधरण महत्व आहे. जर या गोष्टी कोणी अमान्य केल्या तर मग राशी ही संकल्पनाच कोलमडून जाईल. मग राशींची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित होईल. राशी हा फलज्योतिषाचा एक महत्वाचा स्तंभ आहे याच्या शिवाय फलादेशाची कल्पनाच करता येत नाही. कृष्णमुर्ती पद्धतीत ग्रहांना कायमचे शुभत्व अथवा अशुभत्व नाही आहे. एखाद्या ग्रह एखाद्या भावाचे शुभ फल देईल तोच दुसऱ्या भावाचे अशुभ फल सुद्धा देऊ शकतो म्हणजेच ग्रह हा संपुर्ण पत्रिकेसाठी शुभ अथवा अशुभ असणार नाही. तसेच “उच्च ग्रह हा शुभ व नीच ग्रह हा अशुभ” हे मात्र श्री कृष्णमुर्तींनी साफ नाकारले आहे.  तसेच राजयोग कृष्णमुर्ती पद्धतीत नाकारले आहेत. पण राशितत्वे जशीच्या तशीच स्विकारली आहेत.

कृष्णमुर्ती पद्धतीचा मुलभूत नियम आहे की, ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फले देतो. इथेच सर्व काही येते. कोणताही ग्रह उच्च अथवा नीच आहे हे त्याच्या नक्षत्र स्वामी वरून ठरते . थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर उच्च ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह बलवान तर नीच ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह हे बलहीन समजायचे, म्हणजे ग्रहांचे उच्चत्व व नीचत्व मान्य आहे. उदाहरण देऊन सांगायचेच झाले तर असे देता येईल की, समजा शनी तुळ राशीत चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असेल व मंगळ पुष्य या शनिच्या नक्षत्रात कर्क राशीत असेल तर पारंपारीक पद्धतीप्रमाणे शनी हा उच्च राशीत असल्याने बलवान मानला जाईल तर मंगळ नीच राशीत असल्याने बलहीन मानला जाईल पण कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे “ग्रह हा आपल्या नक्षत्र स्वामीप्रमाणे फले देतो” या नियमानुसार शनी हा नीच ग्रहाच्या नक्षत्रात असल्यामुळे बलहीन तर मंगळ हा उच्च ग्रहच्या नक्षत्रात असल्यामुळे बलवान मानला जाईल. पारंपारीक व  कृष्णमुर्ती पद्धतीमध्ये हा फरक असेल इथे अशाप्रकारे ग्रहांचे उच्चत्व व नीच्चत्व पाहीले जाईल. ते अमान्य केलेले नाही.

कृष्णमूर्ती सिद्धांत या आपल्या पुस्तकात श्री हसबे सर काय म्हणतात पहा. (पान क्र. ८) –

“……. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.”

KP Reader 6

KP Reader 6 Jyotish jagat

श्री कृष्णमुर्तीनी आपल्या Horary Astrology – Advanced Stellar System या ६ व्या रिडरमध्ये एक उदाहरण देऊन याचे अतिशय उत्तम विश्लेषन केले आहे. “मला हुंडा मिळेल काय ?” या प्रश्नाच्या बाबतीत हुंडा किती प्रमाणात मिळेल हे सांगताना श्री कृष्णमुर्ती म्हणतात कि, जर ११ व्या भावाचा सब जर उच्च ग्रहाच्या नक्षत्रात स्थित असेल तर हुंडा अधिक प्रमाणात मिळेल व तोच सब जर नीच ग्रहांच्या नक्षत्रात असेल तर हुंडा खूपच कमी प्रमाणात अगर नांवापुरताच मिळेल. (Page 255). कृष्णमुर्ती पद्धतीत बरेच नियम हे विखूरलेल्या स्थितीत, उदाहरणांच्या अनुशंगाने येत असतात. ते वेगळे असे दिलेले नाही आहेत. त्यासाठी त्यांची रिडर्स नेहमी सतत वाचत राहल्यास अनेक नविन गोष्टी प्रत्येक वेळी लक्षात येतात. बऱ्याच ठिकाणि चूकिच्या भाष्यामुळेही (Interpretation) गोंधळ उडतो. केवळ वर वर नियम वाचणे म्हणजे ज्योतिष शिकणे नव्हे. म्हणूनच फेसबुक अगर इतर सोशल मिडियावरून ज्योतिष सारखे शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करण्याला माझा नेहमीच तीव्र विरोध असतो. इथे कोणीही काहीही नियम सांगून नविन विद्यार्थ्यांना भ्रमित करु शकतो. नियम वाचून, समजून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा हे ज्योतिषाचे खरे कौशल्य आहे. आणि हे फेसबुकवरुन शिकता येत नाही.

हा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ठ्ये (मूलभूत)


Uttam Gawade

श्री उत्तम गावडे

ज्योतिष विशारद, वास्तुविशारद

9901287974, 8722745745

 

कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें –

कृष्णमूर्ती पद्धतीची वैशिष्ट्यें (मूलभूत) –

ज्योतिषशास्त्र हे गणितशास्त्र व खगोलशास्त्र या दोन शास्त्रांवर आधारित आहे. कृष्णमूर्ति पद्धतीचा नक्षत्रगणित हा तर गाभाच आहे. त्यामुळे नक्षात्रगणिताधिष्ठित फलादेश अगदी सूचक व तर्कशुद्ध सांगितला जातो. त्यामुळे ज्याला बेरीज- वजाबकी गुणाकार-भागाकार या स्वरुपाचे अगदी प्रारंभीक अवस्थेतले गणित येते. ज्याला शास्त्रची मूळ प्राथमिक माहीती आहे. त्या कोणालाही कृष्णमूर्ति पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन घेऊन, स्वत:चे व इतरांचे भविष्य पाहता येईल. अशी ही बिनचूक फलादेश देणारी, तर्कशुद्ध नियमावली असलेली, एक आगळीवेगळी आणि अभिनव अशी सुलभ पद्धत आहे. फलितासाठी विचारांची दिशा लवकर मिळते. अशा या नविन्यपूर्ण पद्धतीचे जनक आहेत; कै. प्रोफसर के. एस. कृष्णमूर्ती!
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीची काही वैशिष्ट्यें अशी:-

१- कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्राची, विंशोतरी दशेच्या प्रमाणात नऊ असमान भागात विभागणी केली आहे. आणखी त्याहीपुढे जाऊन कृष्ण्मूर्तींनी या नऊ भागांचे आणखी प्रत्येक ९ – ९ भाग करुन म्हणजे (९*९= ८१ भाग) करुन नक्षत्राच्या सूक्ष्मात प्रवेश केला आहे. त्यामुळे फलादेशात सूक्ष्मता व अचूकता येण्यास मदत होते. त्यांच्या या सब-सब विभागणीचा जूल्या मुलांच्या पत्रिका सोडविताना फार उपयोग होतो.

२- भावसाधन करण्यासाठी कृष्ण्मूर्तींनी, पाश्चात्य ज्योतिर्विद राफेल यांचे “टेबल्स ऑफ हाऊसेस” हे पुस्तक ग्राह्य धरले आहे. कुंडली मांडतांना भावारंभ पद्धतीचा (प्लासिडस) पुरस्कार केला आहे.

३- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे. उदा. विवाहाचा विचार करतांना त्यांनी कुटुंबस्थान- सप्तमस्थान व लाभस्थान विचारात घेतले आहे. असेच इतर प्रश्नांसंबंधी आहे. प्रत्येक ग्रहाचे बल पाहण्यासाठी त्याम्चा निश्चित क्रम ठरलेला आहे.

४- कोणताही ग्रह हा, पत्रिकेतील त्याच्या एकंदर स्थिती व भावेशानुसार फले कोणत्या मार्गाने मिळतील हे दर्शवितो. तर नक्षत्रस्वामी (स्टारलॉर्ड) मिळणारी फले दर्शवितो. तसेच उपनक्षत्र स्वामी (सब लॉड) हा ती घटना घडणार किंवा नाही हे दर्शवतो. हे सर्वच प्रश्नांच्या बाबतीत अनुभवास येते.

५- एखादी घटना केव्हा घडेल याचा विचार करताना रवी- चंद्र यांचे आणि दशास्वामी व अंतर्दशास्वामी यांचे गोचर भ्रमण कृष्णमूर्तीनी लक्षात घेतले आहे. या पद्धतीने झटकन कालनिर्णय करता येतो. उदा. समजा गुरु दशेत केतूची अंतर्दशा सुरु आहे व हे ग्रहेखाद्या गोष्टीचे कार्येश असतील तर ती गोष्ट ज्यावेळी रवि गोचरीने गुरुच्या धनु राशीत व केतूच्या मूळ नक्षत्रात जाईल त्याच वेळी घडेल. रवी धनू राशीत १६ डिसेंबर नंतर जातो.

६- कृष्णमूर्तीं पद्धतीने फलादेश पाहताना, कृष्णमूर्तींनी सांगितलेले अयनाशंच उपयोगात आणावेत. कारण खूप संशोधन करुन, फलादेशात अचूकता येण्याच्या दृष्टीने, त्यांनी त्याचे स्वत:चे अयानांश निश्चित केले आहेत. कृष्णमूर्तीं पद्धतीचे अयनांश व चित्रा पक्षीय अथवा लाहीरी अयनांश यात केवळ ६ कलेचा फरक आहे. कृष्णमूर्तीं यांनी अयनांशाची वार्षील गति ५०.२३८८४७५ मानली आहे.

७- कृष्ण्मूर्तींनी आपल्या या ज्योतिष पद्धतीत सर्व पाश्चात्य ग्रहयोग व भारतीय पद्धातीने दृष्टीयोग स्विकारले आहेत.

८ – राहू व केतू या छायाबिदूंना कृष्णमूर्ती पद्धतीत असामान्य महत्त्व दिलेले आहे. यांना स्वत:च्या राशि नाही आहेत म्हणून इतर ग्रहांपेक्षा हे दोन छायाबिंदू जास्त जोरदार फले देतात, आणि असा या पद्धतीत हमखास अनुभवही येतो.

९- या पद्धतीत प्रत्येक प्रश्नांसाठी कोणकोणती स्थाने (भाव) वा त्यांचा समूह लक्षात घ्यावा, याची निश्चित कल्पना दिलेली असल्यामुळे फलादेशात सहज सुलभता आली आहे.

१० – ग्रहबलाचा विचार करतांना भारतीय ज्योतिष परंपरेनुसार त्याचे स्वक्षेत्र, उच्चराशी, किंवा मुलत्रिकोणराशी या गोष्टींना य पद्धतीत अति महत्व दिलेले नाही. ग्रहाम्च्या राशीपेक्षा त्याच्या नक्षत्रस्वामीस या पद्धतीत महत्व आहे. उच्च राशीत असलेला कोणताही ग्रह शुभफले देतो हे गृहीत सत्य या पद्धतीत स्विकारले नाही. कर्केचा गुरु शुभ फल देतो वा बलवान असतो असे न समजता जे ग्रह गुरुच्या पुनर्वसु, विशाखा व पुर्वाभाद्रपदा या नक्षत्रात असतील ते ग्रह त्यांचा नक्षत्र स्वामी उच्च राशीत असल्यामुळे बलवान ठरतील. हाच विचार नीच ग्रहांच्या बाबतीत त्यांनी स्वीकारला आहे.

११- जन्मकुंडलीत एखादा वक्रि ग्रह असल्यास तो काहीही वाईट करणार नाही. तो मार्गी ग्रहाप्रमाणेच समजावा. प्रश्नकुंडलीतील वक्री ग्रह मार्गी झाल्यानंतर फले देतो. पण वक्रीग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह फले देण्यात अडचणी आणतात. हा विचार या पद्धतीत ग्राह्य धरला आहे.

——————
संदर्भ – कृष्णमुर्ती सिद्धांत – श्री ज्योतिंद्र हसबे

हा लेख हि वाचा ... कृष्णमूर्ती पद्धती आणि ग्रहांचे उच्च निचत्व